अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी ह्या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या पाणकोटावरून नजर ठेवता येत असे.
Arnala Fort, Arnala Fort Trek, Arnala Fort Trekking, Thane
इतिहास
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकुण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्ती व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखामधील बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर ! पाश्चात्यासि वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा ! या ओळीवरून या किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्याने केली हे लक्षात येते किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळ आहे. याशिवाय किल्ल्यात गोड्यापाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे. समुद्रकिनाऱ्यावरून किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरून किल्ल्याचे सभोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणाऱ्या उंचवट्यावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
पश्चिम रेल्वेवरच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. वर असून येथे जायला एस.टी बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते. ही बोट सकाळी ६:०० ते दुपारी १२:३० व संध्याकाळी ४:०० ते ७:०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनाऱ्यावरून समोरच दिसणाऱ्या अर्नाळा किल्लावर बोटी जायला ५-१० मिनिटे लागतात.
राहण्याची सोय
गडावर राहण्याची सोय नसली तरी संपूर्ण गड अर्धा-पाऊण तासात बघून बोटीने किनाऱ्यावर परतता येत असल्याने राहण्याची सोय गरज नाही.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय
गडावर गोड्यापाण्याच्या विहिरी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ
१ तास विरार पासून लागतो.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



