मुंबई जवळ समुद्रात असलेल घारापुरी बेट (एलिफ़ंटा) त्यावरील लेण्यांमुळे प्रसिध्द आहे. मुंबई बघायला आलेला पर्यटक घारापुरीची लेणी पाहातोच. पण त्या लेण्यांच्या वरच्या बाजूस असलेला किल्ला पाहायला फ़ार कमीजण जातात. हा किल्ला आणि त्यावरील तोफ़ा ब्रिटीशकालिन असल्या तरी या बेटाचा इतिहास पाहाता याठिकाणी पूर्वीच्या काळीही किल्ला असावा पण दुर्दैवाने आज त्याचे अवशेष पाहायला मिळत नाहीत.
Gharapuri Fort, Gharapuri Fort Trek, Gharapuri Fort Trekking, Raigad
इतिहास
सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने कोकणच्या मौर्यांची पुरी ही राजधानी काबिज केल्याचा उल्लेख ऐहोळे (कर्नाटक) येथील शिलालेखात आहे. " पुरी ही पश्चिम समुद्राची लक्ष्मी, मत्त गजांच्या गंडस्थलांप्रमाणे आकार असलेल्या शेकोडो नावांच्या सहाय्याने पुलकेशीने पुरीला वेढा घातला". असा उल्लेख शिलालेखात आढळतो. पुरी म्हणजे घारापुरी. कोकणच्या मौर्यांची पुरी ही राजधानी होती. मौर्यांनंतर, बदामीचे चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकुट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, गुजरातचा सुलतान यांची सत्ता घारापुरीवर होती. १५ व्या शतकात आलेल्या पोर्तुगिजांनी येथिल लेण्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान केल. त्यानंतरच्या काळात मराठ्यांची सत्ता घारापुरीवर होती. ब्रिटीश काळात मुंबईशी या बेटाच असलेल सानिध्य पाहुन मुंबईच्या संरक्षणासाठी घारापुरी बेटावर किल्ला बांधण्यात आला. आजही या किल्ल्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
घारापुरी बेटावर दोन डोंगर आहेत. त्यातील उजव्या बाजुच्या डोंगरावर किल्ल्याचे अवशेष आहेत. लेण्याकडे जाण्यासाठी पायर्यांच्या मार्ग आहे. या पायर्यांच्या शेवटी दोन वाटा फ़ुटतात. डावी कडची वाट लेण्यांकडे तर उजवीकडची वाट तोफ़ांकडे जाते. उजवीकडे जाणार्या वाटेने १५ मिनिटाची चढाई केल्यावर किल्ल्याचे अवशेष दिसतात. पुढे गेल्यावर एक प्रचंड तोफ़ दिसते. ३५ फ़ुट लांब असलेल्या या तोफ़ेची वर खाली हालचाल करण्यासाठी गियर्स बसवलेले आहेत. तसेच तोफ़ेचा मारा सर्व दिशांनी करण्यासाठी तोफ़ ३६० अंशात वळवण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यासाठीही गियर्सची सोय करण्यात आली आहे. तोफ़ेच्या खाली उतरल्यावर हे सर्व पाहाता येते. तोफ़ेच्या खालच्या बाजूला दारूगोळ्यासाठी खोल्या बांधल्या आहेत. तसेच सैनिकांना राहाण्यासाठी बॅरॅक्स बांधलेल्या आहेत. या जमिनी खालील बॅरॅक्समधे हवा खेळण्यासाठी छताला इंग्रजी "L" पाईप्स बसवलेले आहेत. त्याची टोक जमिनीच्यावर काढलेली आहेत. त्यातुन येणारी शुध्द हवा बॅरॅक्समधे खेळवण्यात येत असे.
पहिली तोफ़ पाहुन दुसर्या तोफ़ेकडे जातांना वाटेत. दोन ठिकाणी वास्तूंचे अवशेष आहेत. दुसरी तोफ़ही ३५ फ़ुट लांब असुन या तोफ़ेची वर खाली हालचाल करण्यासाठी गियर्स बसवलेले आहेत. तसेच तोफ़ेचा मारा सर्व दिशांनी करण्यासाठी तोफ़ ३६० अंशात वळवण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यासाठीही गियर्सची सोय करण्यात आली आहे. तोफ़ेच्या खाली असलेल्या दारुगोळ्याच्या कोठारातून तो वर आणण्यासाठी चेन पुलीची रचना केलेली आहे. याठिकाणीही जमिनी खालील सैनिकांच्या बॅरॅक्स आहेत. या दोन तोफ़ा आणि सैनिकांच्या डोंगरा खालिल बॅरॅक्स पाहील्या की किल्ला पाहुन होतो.
किल्ल्यावरून पूर्वेला द्रोणागिरी किल्ला आणि दक्षिणेला खांदेरी - उंदेरी किल्ले दिसतात.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
गेट वे ऑफ़ इंडीया , मुंबई येथुन सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत घारापुरीला जाण्यासाठी बोटी मिळतात. घारापुरीहुन मुंबईला येण्यासाठी शेवटची बोट संध्याकाळी ६.०० वाजता आहे. गेट वे ऑफ़ इंडीया ते घारापुरी बोटीने जाण्यास एक तास लागतो. घारापुरी जेटी वरून लेण्यांपर्यंत जायला अर्धा तास लागतो.लेण्याकडे जाण्यासाठी पायर्यांच्या मार्ग आहे. या पायर्यांच्या शेवटी दोन वाटा फ़ुटतात. डावी कडची वाट लेण्यांकडे तर उजवीकडची वाट तोफ़ांकडे जाते. (येथे MTDC चे हॉटेल आहे.) उजवीकडे जाणार्या वाटेने १५ मिनिटाची चढाई केल्यावर किल्ल्याचे अवशेष दिसतात.
किल्ला आणि लेणी नीट पाहाण्यासाठी अंदाजे २ ते ३ लागतात.
राहाण्याची सोय
येथे MTDC चे हॉटेल आहे.
जेवणाची सोय
जेवणासाठी भरपुर हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय
पिण्याचे पाणी लेण्यांजवळ आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
घारापुरी जेटी पासून पाऊण ते एक तास लागतो.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



