मुंबईपासून ६२ कि.मी. वर व पनवेलपासून १३ कि.मी. वर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी दाट जंगल आहे. त्यात अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. पेण-पनवेल रस्ता ह्याच्या पायथ्याजवळून जातो. इथे पक्षी अभयारण्य आहे. १५० हून अधिक जातींचे पक्षी इथे आढळतात. सतत हिरवे जंगल हे इथले वैशिष्ट्य. येथील किल्ल्यावर ५० मीटर उंचीचा उत्तुंग कावळकडा आहे.
Karnala Fort, Karnala Fort Trek, Karnala Fort Trekking, Raigad
किल्ल्याची उंची: २५०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: माथेरान
जिल्हा: रायगड
श्रेणी: सोपी
पनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या अंगठ्या सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो कर्नाळ्या खालचे अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे. एक ते दोन दिवसाच्या भटकंतीत येथील सर्व किल्ले फिरून होतात.
इतिहास
किल्ल्यांमध्ये असणाऱ्या टाक्यांवरून हा सातवाहनकालीन असावा असे वाटते मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणाऱ्या २३ किल्ल्या मध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. यानंतर सन १६७० नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला. आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला.सन १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
हा किल्ला प्रसिद्ध आहे तो येथील पक्षी अभयारण्यामुळे. किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात. वाटेने किल्ल्यावर येतांना एक दरवाजा लागतो. दरवाजा बऱ्याचशा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच, भवानी मातेचे मंदिर आहे. समोरच एक मोठा वाडा आहे. वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या समोरच शंकराची पिंड आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहे. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा हवे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
मुंबई- गोवा मार्गाने
मुंबई- गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. या गावानंतर लगेच पुढे कर्नाळ्याचा परिसर लागतो. महामार्गाच्या डावीकडेच शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल्स आहेत. एस.टी येथे थांबते. समोरच असणाऱ्या हॉटेल जवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाटा चांगली प्रशस्त आहे. साधारण किल्ल्यावर पोहचण्यास अडीच तास लागतात. वाटेतच बाजूला पक्षई संग्रहालय आहे.
रसायनी – आपटा मार्गाने
रसायनी -आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते. वेळ साधारण ३ तास.
राहण्याची सोय
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. मात्र किल्ल्याच्या पायथ्याच्या असणाऱ्या शासकीय विश्रामधामात रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय
किल्ल्याखाली हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय
गदावर बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
२.३० तास


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



