मुल्हेर किल्ला Mulher Fort – ४२९० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणाऱ्या या सह्याद्रिच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मंगी-तुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत तर दुसऱ्या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, घरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. बागुलगेड म्हणजेच बागलाण, सुपीक, संपन्न आणि सधन असा प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हा असल्याने येथील जनजीवनावर गुजराती आणि महाराष्ट्रीय अशा संमिश्र आचारविचारांचा प्रभाव पडलेला आहे. पाण्याचे प्रमण जास्त असल्याने बागायती शेती मोठ्या प्रमाणावर चालते त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती ही फार चांगली आहे. मुल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. किल्ल्याच्य पायथ्याशी मुल्हेर नावाचे गाव आहे.
Mulher Fort, Mulher Fort Trek, Mulher Fort Trekking, Nashik
इतिहास
मुल्हेरचा किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होत. मात्र कालंतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे २ कि.मी. अंतरावर वसले. हे मुल्हेर गाव महाभारतकालीन आहे. याचे नाव होते रत्नपूर. या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर नाव पडले. तर किल्ल्याला मयूरगड नाव पडले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले.पुराणात मुल्हेरचा उल्लेख येतो. मात्र खात्रीलायक माहिती चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मिळते. मुल्हेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला. इ.स. १३०८ ते १६१९ पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुलगेड व त्याचा अपभ्रंश बागलाण हे नाव पडले. बागुल राजे हे मुळचे कनोजचे. या बागुल घराण्याच्या काळातच जगप्रसिद्ध मुल्हेरीमूठ बनवण्यात आली. या घराण्यात एकूण ११ राजे झाले. या राजांना बहिर्जी ही पदवी होती. विजयनगरमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलाण मध्ये हिंदूसत्ता प्रस्थापित होती.
अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलाणचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले. पुढे शाहजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. जुले १६३६ ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. इ.स. १६३८ रोजी वैभवशाली हिंदुचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलणची परंपरागत राजधानी. किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली. या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे नामकरण झाले. इ.स. १६६२ मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपुऱ्या पगारासाठी बंड केले. दुसऱ्या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागळाण मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मराठ्यांनी १६७१ मध्ये प्रथम मुल्हेर वर हल्ला केला पण किल्लेदाराने तो थोपवून धरला. मग मराठ्यांनी त्याचा नाद सोडला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठ्यांनी मुल्हेरगड काबीज केला. त्यानंतर पुन्हा किल्ला मोगलांच्या हातात पडला. पुढे इ.स. १७५२ च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेरसकट खानदेशमधील सर्व प्रदेश मराठ्यांच्या हाती आला. यानंतर त्रिंबक गोविंद मुल्हेरचा किल्लेदार झाला. पुढे १७६५ मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आहेत. अशा १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत सापडला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
मुल्हेरगडाचे प्रामुख्याने २ भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि मुल्हेर बालेकिल्ला. गणेशमंदिरा पासून २ वाटा फुटतात. एक वाट वर चढत जाते व दुसऱ्या वाटेला येऊन मिळते. या वाटेने डावीकडे गेल्यावर १० मिनिटांतच सोमेश्वर मंदिर लागते तर उजवीकडे जाणारी वाट आणि गणेशमंदिरा पासून निघणारी उजवीकडची वाट एकत्र येऊन मिळतात. याच वाटेने थोडेपुढे गेल्यावर एक पठार लागते. पठारापासून दोन वाट लागतात. वर जाणारी वाट मोती तलावापासी जाते. या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. पठारापासून समोर जाणारी वाटा राजवाड्यांच्या भग्न अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजदेखील आहे. राजवाड्यांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मणमंदिर लागते. राजवाड्यांच्या वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यांमधील खिंड लागते. सोमेश्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे ३ मजली चंदनबाव लागते. सध्या येथ प्रचंड झाडू झुडूपे आहेत. सोमेश्वर मंदिर राहण्यसाठी उत्तम जागा आहे. मोती टाक्यांच्या उजवीकडे वर चढत जाणाऱ्या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. आत गेल्यावर डावीकडे गुहा आहेत. तर समोरच पाण्याच टाकं आहे. मुल्हेरगडाचा बालेकिल्ला म्हणजे मोठे पठार. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याची ९-१० टाकी आहेत. राजवाड्याचे भग्नाशेष, भडंगनाथांचे मंदिर या सर्व गोष्टी आहेत. भडंगनाथांच्या मंदिराच्या वर असणाऱ्या टेकडीवरून खाली उतरलो की मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. समोरच असणारी मांगी-तुंगीची शिखरे, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमानगड लक्ष वेधून घेतात.
गडावर जाण्याच्या वाटा
मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेर गावातूनच जातात. मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ कि.मी चे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे आल्यावर डावीकडे एक घर लागते. आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.
सरळ वाट: सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास पुरतो.
उजवीकडची वाट: उजवीकडच्या वाटेने गेल्यावर दोन तासांनी आपण मुल्हेरमाची वरील गणेश मंदिरात पोहचतो. या वाटेनेही गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ही वाट जरा दूरची आहे. ही वाट हरगड व मुल्हेर किल्ला यांच्या खिंडीतून वर चढते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड लागतो. या वाटेने गडावर पोहचण्यास ३ तास लागतात.
मुल्हेरमाचीवरील सोमेश्वर आणि गणेश मंदिरात अणि बालेकिल्ल्यावर असणाऱ्या गुहेत राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते.गडावरील मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र हे पाणी फेब्रुवारीपर्यंतच उपलब्ध असते. गडावर जाण्यासाठी साधारण २ तास गावापासून साधारण ३ तास खिंडीतल्या वाटेने लागतात.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



