किल्ल्याची ऊंची: १३५७ फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग जिल्हा: रायगड

सागरगडहा दुर्लक्षित असा आड वाटेवरचा किल्ला आहे. अलिबागजवळील डोंगरावर सागरगड वसलेला आहे. पुण्या-मुंबई पासून एका दिवसात व कोणत्याही ऋतुत या किल्ल्याला भेट देता येते. मात्र पावसाळ्यात सागरगड हा एका दिवसाच्या भटकंती साठी उत्तम पर्याय आहे. अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. छ. शिवाजी महाराजांसारख्या दुरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्यातील समुद्र किनार्‍याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनार्‍यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.

Sagargad Fort, Kheddurg Fort Trek, Sagargad Fort, Kheddurg Fort Trekking, Raigad

सागरगड कोणी व केव्हा बांधला हे ज्ञात नाही. मात्र गडाच्या बांधणीवरून तो निजामशाहीत बांधला गेला असावा असे वाटते. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. आग्र्‍याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला. संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला. छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्‍यांनी येथे विश्रामधामे बांधली होती. (संदर्भ : trekshitiz संस्था वेबसाईट).

सागरगडला जाण्यासाठी अलिबागच्या अलीकडेच पाच किमी अंतरावर खंडाळे गाव आहे. इथेच गावाच्या नावाची हिरवी पाटी दिसेल. या पाटी शेजारून डाव्या हाताला एक छोटीशी डांबरी सडक पवेळे नावाच्या छोट्या खेड्यात जाते. या गावाच्या पूर्वेला एक डोंगर व मोठा धबधबा दिसतो. या डोंगराच्या पाठीमागे सागरगड लपलेला आहे. हा किल्ला इतर डोंगररांगांपासून खिंडीने विभागला गेल्यामुळे जवळ जाई पर्यंत दिसत नाही. समोरील या डोंगराच्या पायथ्याशी जाणारी सडक अर्धी कच्ची आहे, त्यामुळे पावसाळा सोडल्यास गाडी पायथ्यापर्यंत नेता येते. पावसाळ्यात पवेळे गावातच आपली गाडी लावावी व येथून २० मिनिटे चालत डोंगर पायथा गाठावा. गावातून डोंगराकडे जाताना पावसाळ्यात दोन टप्प्यात पडणारा ‘‘धोंदाणे’’ धबधबा आपल्याला प्रथमदर्शनी दिसतो. या धबधब्याच्यावर सिध्देश्वर मंदिर व मठ आहे.

डोंगराच्या पायथ्याशी एक ओढा आहे. ओढा ओलांडल्यावर बांधीव पायर्‍यांची वाट डोंगरावर जाते. उभ्या चढणाची ही वाट एक तास चढल्यावर आपण सिध्देश्वर मंदिरात येतो. नागमोडी चढनीच्या वाटा चढताना चांगलीच दमछाक होते, पण सिद्धेश्वरच्या या हिरव्यागार परिसरात येऊन सर्व थकवा नाहिसा होतो. मंदिरासमोरच गोड्या पाण्याची विहीर आहे. इथे बारमाही पाणी असते.

आश्ररमाच्या थोडं अलिकडेच एक वाट डावीकडे वर सागरगडाकडे जाते. सिध्देश्वर मंदिरापासून पासून साधाणत अर्ध्या तासात आपण सागरगडवाडी नावाच्या ठाकर वस्तीत येऊन पोहचतो. या रस्त्यावर चारही बाजूने डोंगर, घनदाट वृक्ष आणि दिवसाही रातकिड्यांचा किर्र आवाज ऐकायला येतो. या पठारावर करवंदाची काटेरी झाडं पहायला मिळतात. या ठाकर वस्तीतून पूवेर्कडे चालत गेल्यावर समोरच सागरगडाचा पाहारेकरी असलेला वानरटोक सुळका दृष्टीस पडतो. डाव्या हाताला घनदाट जंगल आणि उजव्या हाताला खोल दरी, अशा वाटेने सागरड दुरूनही व्यवस्थित न्याहळता येतो. पायथ्यापासून साधारण २ तासाच्या चालीनंतर प्रथमच आपल्याला सागरगड व त्याच्या वानरटोक सुळक्याचे दर्शन होते. सागरगड दिसू लागल्यानंतर दरीच्या काठाकाठाने जाणाऱ्या पायवाटेने एक वळण घेऊन साधारण ३० मिनिटात आपला गडामध्ये प्रवेश होतो. पायथ्याच्या पवेळे गावापासून गड प्रवेश करण्यास साधारण ३ तास लागतात.

किल्ल्यावरील उंचवट्याला ४ मीटर उंचीची तटबंदी व ५ बुरुज बांधून बालेकिल्ला बनवण्यात आला आहे. बालेकिल्ल्याच्या पुर्वेकडील तटबंदी समोर खोदलेला खंदक आता बुजलेला आहे. येथेच बालेकिल्ल्याचा चोर दरवाजा व ढासळलेली तटबंदी आहे. या ढासळलेल्या तटबंदीवर चढाई करुन बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. बालेकिल्ल्यात उंचवट्यावर पत्र्याचे देऊळ आहे. त्यात महिषासूरमर्दिनी, गणपती व शिवलींग यांच्या दगडात कोरलेल्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या खालच्या बाजूला कड्याच्या टोकाला पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील गोमुखातून नितळ पाण्याची संततधार पडत असते.

कुंडाच्या पुढे किल्ल्याच्या दोन सोंडा दोन बाजूला जातात. उजव्याबाजूच्या सोंडेवर एक समाधी आहे. त्याला सतीचा माळ म्हणतात. डाव्या बाजूच्या सोंडेवर इंग्रजांनी बांधलेल्या विश्रामधामाचे अवशेष आहेत. किल्ल्यावरुन खांदेरी- उंदेरी हे किल्ले, अलिबागथळचा समुद्रकिनारा, धरमतरची खाडी, माथेरान, प्रबळगड हे किल्ले, चौलची खाडी असा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. संपुर्ण गडफेरी करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.

संपुर्ण गडफेरी व गडावरील अवशेष पाहण्यासाठी अंदाजे दीड तास पुरतो.

गड चढाईसाठी लागणारा वेळ: (१) पायथ्याचे गाव ते सिद्धेश्वर मंदिर – १ तास (२) सिद्धेश्वर मंदिर ते सागरगडवाडी – १/२ तास (३) सागरगडवाडी ते गड माथा – १ तास – एकूण २ १/२ तास.

गड उतराईसाठी लागणारा वेळ: २ तास.

गडावर रहाण्याची सोय नाही मात्र सिध्देश्वर मंदिरात किंवा सागरगडमाचीवरील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकेल. गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही, परंतू सिध्देश्वर मठात चहा मिळू शकतो. गडावर, सिध्देश्वर मंदिरात व सागरगडमाचीवर पाण्याची सोय आहे.