माणागंगा नदी जिथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर एक किल्ला आहे त्याचे नाव आहे वारुगड. किल्ला माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर आहे.
Varugad Fort, Varugad Fort Trek, Varugad Fort Trekking, Satara
इतिहास
किल्ला शिवरायांनी बांधला असे सांगतात. या किल्ल्याचा किल्लेदार परभूजातीचा होता. २०० पहारेंकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती. १८१८ मध्ये साताराच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावपासून घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
किल्ला हा दोन भागात मोडतो. एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला.
१) वारुगड माची: किल्ल्याच्या माचीवर गेल्यावर समजते की गडाचा घेरा केवढा मोठा आहे. किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदी वेष्टीत आहे. आजही ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतून पुढे जातो. या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते. मात्र सद्य स्थितिला दोनच शिल्लक आहे. गिरवी जाधववाडी या मार्गेमाचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाजातून वर येते. तर मोंगळ-घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुसऱ्या दरवाजातून वर येते. माचीवर घरांचे, वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. दोन ते तीन पाण्याचीटाकी, तळी सुद्धा आहेत. मचीवर भैरोबाचे जीर्णोद्धारीत मंदिर सुद्धा आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.
२) बालेकिल्ला: गिरवी जाधववाडीतुन माचीवर येणारा रस्ता दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभातला जातो. उजवीकडे आणि डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारपाशी येऊन धडकते. दरवाजाची तटबंदी आजही शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर समोरच एक इमारत आहे. आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे. समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे. विहीर बऱ्याच प्रमाणात बुजलेली आहे. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहिला की आपल्याला जाणवते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समोरच दिसणारा सीताबाईचा डोंगर, महादेव डोंगररांग हा परिसर दिसतो. संतोषगडावरून सीताबाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते.
गडावर जाण्याच्या वाटा
वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे. फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. वारुगड मुख्यतः दोन भागात विभागला आहे. एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे. तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतून जावे लागते. माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.
१) फलटण ते गिरवी: फलटण ते गिरवी अशी एस.टी. सेवा उपलब्ध आहे. गिरवीतून ५ कि.मी. अंतरावर असणारा जाधववाडा गाठावा. जाधववाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. येथून वारूगड माचीवर जाण्यास २ तास लागतात. माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे पुरतात.
२) फलटण दहीवडी: फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर २० कि.मी. अंतरावर मोंगळ नावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून एक कच्चा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो. मोंगळ ते घोडेवाडी अंतर १५ कि.मी.चे आहे. फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर २६ कि.मी. अंतरावर बीजवाडी नावाचे गाव लागते. या गावातून एक कच्चा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडीत जातो. पुढे हा रस्ता वर सांगितलेल्या रस्त्याला येऊन मिळतो.
वारुगडाच्या माचीवर असणाऱ्या भैरवगडाच्या मंदिरात १०० लोकांची सोय होते. जेवणाची सोय आपणच करावी. माचीवर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे. गडावर जाण्यासाठी जाधववाडीतून दोन तास लागतो. गडावर जाण्यासाठी सर्व ऋतुत जाता येते.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



